Tuesday 28 June 2016

मूल्यवर्धन कार्यक्रमाचे थाटात उद्घाटन- शालेय शिक्षणातून संविधानिक मूल्ये रुजविणे काळाची गरज: माधुरी सुरजागडे, सरपंच - तळोधी

तळोधी (मो) : भारतीय संविधान हे जगातिल एक अद्वितीय संविधान असून ते समस्त भारतीयांच्या मानवी जीवनाच्या कल्याणाचे महत्वपूर्ण दस्तावेज आहे. म्हणून शालेय शिक्षणातुनच  संविधानिक मूल्ये रुजविणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन तळोधीच्या सरपंच माधुरी सुरजागडे यांनी केले. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या परिषद) पुणे व शांतिलाल मुथ्था फाऊंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्र शाळा, तळोधी (मो) येथे आयोजित तीन दिवसीय मूल्यवर्धन कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.

उद्घाटक म्हणून बोलतांना  शिक्षण विस्तार अधिकारी धर्मानंद मेश्राम यांनी सांगितले की भारतीय संविधान हे भारतीय समाजाच्या अधिकार आणि हक्काचे संरक्षण करणारे आणि मानवी मूल्याची जोपासणा करुन समाजामध्ये समता प्रस्थापित करणारे एक महत्वाचे दस्तावेज आहे. म्हणून भारतीय संविधानाची ओळख करुन घेणे प्रत्येक भारतीयासाठी आवश्यक आहे. भारतीय संविधानाविषयी पसरविण्यात आलेले गैरसमज दूर करुन ते ख-या अर्थाने समजुन घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले .
विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातच भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय ही मूल्ये रुजावित यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या परिषद)  पुणे व शांतिलाल मुथ्था फाऊंडेशन , पुणे यांच्या वतीने "मूल्यवर्धन" या उपक्रमाची जिल्ह्यात सुरवात करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातिल चामोर्शी तालुक्याच्या तळोधी (मो) या केंद्राची यासाठी प्रयोगिक तत्वावर निवड करण्यात आली असून सन २०१५-१६ मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,खोर्दा या शाळेपासुन या उपक्रमाची सुरवात झाली असून उपक्रमाची परिपूर्ण माहिती व्हावी यासाठी मूल्यवर्धन उपक्रम कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. बीड जिल्ह्यापासून सुरु झालेला   हा उपक्रम टप्प्या टप्प्याने  विस्तारित करण्यात येणार असून पुढील सत्रात पूर्ण चामोर्शी तालुका व त्यानंतर संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यासह राज्यामध्ये याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. 

या उपक्रमाची योग्य अंमलबजावणी करण्यात यावी , त्यासाठी लागणारे सर्व सहकार्य करण्यात येइल असे जिल्ह्याचे उपक्रम संपर्क प्रमुख प्रा. राजन बोरकर यांनी केले.  कार्यशाळेचे प्रास्ताविक व संयोजन केंद्राचे केंद्र प्रमुख गौतम मेश्राम यांनी केले. या प्रसंगी शांतिलाल मुथ्था फाऊंडेशनचे निरीक्षक विकास वाघमोडे हे निरीक्षक म्हणून उपस्थित होते. कार्यशाळेसाठी साधनव्यक्ती म्हणून गौतम मेश्राम, नंदकिशोर धोटे , अतुल कुनघाडकर यांनी काम केले. कार्यक्रमाचे संचलन अर्चना लिंगावार तर आभार प्रदर्शन ओमप्रकाश बोमनवार यांनी केले. कार्यशाळेला चाळीस शिक्षक हजर होते.

तीन दिवसीय कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी गटशिक्षणाधिकारी पी एम सहारे, शिक्षण विस्तार अधिकारी धर्मानंद मेश्राम ,  रेगडी चे केंद्र प्रमुख के एम सहारे व अन्य उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment